लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून एक महिना पूर्ण झाले आहे. एनडीए'ने सरकार स्थापन केले. दरम्यान, कर्नाटकातीलभाजपाचे खासदार के सुधाकर यांनी आता सेलीब्रेशन केले आहे. के सुधाकर यांनी आनंदाच्याभरात आपल्या मतदारसंघात लोकांना बिअर वाटल्या आहेत. याबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता त्यांच्यावर टीका सुरू झाल्या आहेत.
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील बिअर वाटत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपाचे माजी आरोग्य मंत्री खासदार के सुधाकर यांनी निवडणुकीत विजयाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपच्या नेलमंगला युनिटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेकडो लोकांना बिअरचे वाटप करण्यात आल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.
Video - "मत दिलं नाही तर मी काम करणार नाही, सबका साथ-सबका विकास हा मुद्दा चालणार नाही"
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका कार्यक्रमात शेकडो लोकांना बिअरच्या बाटल्या दिल्या जात असल्याचे दिसत आहे. नेलमंगलाजवळील बाविकेरे गावात माजी मंत्री एचडी रेवन्ना यांच्या शेतात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर अशोक, सुधाकर, आमदार देवराज मुनिराजू यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. बिअरचे १५० बॉक्स आणि व्हिस्कीच्या ५० बॉक्स लोकांना वाटल्याचे बोलले जात आहे. यावेळी लोकांना मांसाहारही देण्यात आला.
दरम्यान, आता या प्रकरणी राजकीय वर्तुळातून भाजपावर जोरदार टीका सुरू झाल्या आहेत.
पोलिस म्हणाले, 'आमचा काही संबंध नाही'
दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेंगळुरू ग्रामीणचे एसपी सीके बाबा म्हणाले, “एक्साईज विभागाने परवानगी दिली आणि पोलिसांना व्यवस्था हाताळण्याच्या सूचना दिल्या. यात पोलिस विभागाचा कोणताही दोष नाही, परवानगी देण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे.