नवी दिल्ली: देशात 5 राज्यांच्या निवडणुकांचा जोर पाहायला मिळत असून राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलंच तापलं आहे. त्यात, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी, 623 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात स्वत:ला सिद्ध करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून थंडीचा जोर असतानाही मतदारराजा केंद्रांवर पोहचत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदारांना आवाहन करणारे एक ट्वीट केले आहे. 'देशाला भयमुक्त करा, बाहेर या मतदान करा' असे आवाहन करणारे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. सर्व मतदारांना मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. अनेक मतदारसंघातील केंद्रावर उमेदवार मंडळीही हजर झाली असून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, मतदान शांततेत सुरू असतानाच मथुरा आणि मुझफ्फरनगर येथील केंद्रावर ईव्हीएम बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान, सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. काही केंद्रावरुन मतदान यंत्रात बिघाड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तेथील मतदान यंत्र बदलून देत अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे, असे शामली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पार पडणार आहे. याातील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज 58 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासू सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या भागातील भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून भाजपने मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही.