भुवनेश्वर, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यादाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी विदेशी पर्यटकांना भारतात येण्याआधी आपल्या देशात गोमांस खाऊन येण्याचा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी भारतात फिरण्यासाठी येणा-या पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्स यांनी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे.
अल्फोन्स यांना विचारण्यात आलं होतं की, अनेक राज्यांमध्ये गोमांस बंदी करण्यात आली आहे. बंदीमुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. यावर उत्तर देताना अल्फोन्स यांनी सांगितलं की, 'विदेशी पर्यटक आपल्या देशात गोमांस खाऊ शकतात. त्यामुळे भारतात येण्याआधी त्यांनी तिथेच गोमांस खाऊन यावं'.
केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या 33 व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमात बोलताना त्यांनी विदेशी पर्यटकांना हा सल्ला दिला आहे. अल्फोन्ज यांनी काही दिवसांपुर्वी केरळमधील लोक गोमांस खाऊ शकतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी आता हे वक्तव्य केलं आहे. माजी आयएएस अधिकारी राहिलेल्या अल्फोन्स यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर बोलताना सांगितलं होतं की, 'ज्याप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या राज्यात गोमांस बंदी केली जाणार नाही सांगितलं होतं. त्यानुसार केरळमध्येही गोमांस विक्री कायम राहील'.
अल्फोन्ज यांनी विरोधाभास निर्माण करणारी दोन वेगवेगळी वक्तव्यं केली आहेत. जेव्हा पत्रकारांनी अल्फोन्स यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'ही बिना हाता-पायाची गोष्ट आहे. मी खाद्यमंत्री नाही आहे, जो हा निर्णय घेईल'.
केंद्रीय पर्यटन मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अल्फोन्स यांनी सांगितलं आहे की, 'आमचं मंत्रालय देशातील पर्याटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर काम करत आहे'. पुढे बोलताना ते बोलले की, 'पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसंत त्यांच्याकडे असणा-या कल्पना आमच्याशी शेअर करण्यासही सांगितलं आहे. लोकांकडून येणा-या कल्पना एकत्र करुन एका महिन्यानंतर निवडक कल्पनांवर काम सुरु करणार आहोत'.