नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू शकणार नाही, पण रालोआ सत्तेच्या जवळ पोहोचू शकेल, असा अंदाज टाइम्स नाऊ -व्हीएमआरने केलेल्या जनमत चाचणीतून आढळून आले आहे. भाजपाप्रणित रालोआला २५२ जागा मिळतील आणि काँग्रेसप्रणित यूपीएला १४७ जागा मिळतील, असे या चाचणीचे निष्कर्ष आहेत. अन्य पक्षांना मिळून १४४ जागा मिळतील, असेही या चाचणीतून दिसून आले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपाला २८२ जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपाच्या जागा घसरून २१५ पर्यंत येतील आणि मित्रपक्षांना ३७ जागा मिळून रालोआची सदस्य संख्या २५२ पर्यंत जाईल, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. गेल्या वेळी ४४ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा ९६ जागा मिळतील, असाही या चाचणीचा निष्कर्ष आहे. भाजपाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशात बसेल. गेल्या वेळी ८0 पैकी ७१ जागा मिळवणाºया भाजपा व मित्रपक्षांना मिळून राज्यात केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागेल, तर सपा-बसपा आघाडीला ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. काँग्रेसला मात्र दोनच जागा मिळतील, असे चाचणीतून दिसते. तामिळनाडूमध्येही द्रमुक-काँग्रैस व मित्रपक्षांना ३९ पैकी ३५ जागा व भाजपाला पाठिंबा देणाºया अण्णा द्रमुकला ४ जागा मिळतील, असे दिसते.महाराष्ट्रात मात्र रालोआला यंदा ४८ पैकी तब्बल ४३ जागा, तर यूपीएला केवळ ५ जागाच मिळतील, असेही हा सर्व्हे सांगतो. पश्चिम बंगालमध्ये ताकद वाढवण्याचा भाजपाचा जोरदार प्रयत्न असला तरी भाजपा व मित्रांना ९ जागा मिळतील, तृणमूल काँग्रेसला ३२ जागा तर काँग्रेसला एक जागा मिळेल आणि डाव्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही, असे सर्व्हेतून दिसते. बिहारमध्ये ४0 पैकी २५ जागांवर रालोआला व १५ जागांवर यूपीएला यश मिळेल, असे अहवाल सांगतो.कर्नाटकात काँग्रैस व जेडीएसचे (यूपीए) सरकार असले तरी तिथे लोकसभेच्या २८ जागांपैकी भाजपा व यूपीए यांना प्रत्येकी १४ जागा मिळू शकतील. मध्य प्रदेशात आताच विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपाला सत्तेबाहेर केले. पण लोकसभेच्या २९ पैकी २३ जागा भाजपा व यूपीएला ६ जागा मिळू शकतात, असा जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. रजस्थानातही जनतेने आता काँग्रेसला कौल दिला. पण लोकसभेच्या २५ पैकी १७ जागांवर रालोआ तर यूपीएला ७ जागा मिळतील. गुजरातमध्येही भाजपा २६ पैकी २४ जागांवर बाजी मारेल आणि काँग्रेसला दोनच जागा मिळतील, असे चाचणीचे निष्कर्ष आहेत.डाव्यांच्या गडावर काँग्रेसचा झेंडाआंध्रात २५ पैकी २३ जागांवर वायएसआर काँग्रेस बाजी मारेल व तेलगू देसमला दोनच जागा मिळतील, असे दिसते. तेलंगणात टीआरएसचे सरकार पुन्हा आले आहे. त्याच पक्षाला १७ पैकी १0, यूपीएला ५, रालोआ व अन्य पक्षांना मिळून दोन जागा मिळतील, असे निष्कर्ष सांगतात. ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे सरकार असले तरी तेथील २१ पैकी १२ जागा रालोआ जिंकू शकेल, बिजदला ७ व काँग्रेसला १ जागा मिळेल, असे दिसते. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असले तरी तिथे यंदा काँग्रेसप्रणित यूडीएफला २0 पैकी १६ जागा मिळतील, डाव्यांना ३ व भाजपाला १ जागा मिळू शकेल, असेही या जनमत चाचणीचे निष्कर्ष आहेत.
आगामी लोकसभेत भाजपा वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:04 AM