नवी दिल्ली : ईशान्य भारतात व विशेषत: आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी मुस्लिमांची सीमापार घुसखोरी आणि त्याच्या जोरावर तेथे एका राजकीय पक्षाची होत असलेली वाढ याविषयी केलेल्या विधानांबद्दल लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर गुरुवारी चौफेर टीका झाली. लष्कराने मात्र जनरल रावत यांच्या वक्तव्यांत राजकीय अभिनिवेश नव्हता, असे म्हणून त्यांचे समर्थन केले.दिल्लीतील डीआरडीओ भवनात बुधवारी झालेल्या एका परिसंवादात जनरल रावत यांना आसामच्या काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी मुस्लिमांची लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले. एवढेच नव्हेतर, या घुसखोरीच्या जोरावर तेथे ‘आॅल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (एआययूडीएफ)सारखा मुस्लीमधार्जिणा राजकीय पक्ष झपाट्याने फोफावत असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.एकेकाळी केवळ दोन खासदार असलेल्या जनसंघातून उभा राहिलेला भाजपा आज आपल्याला एवढा मोठा झालेला दिसतो. पण ‘एआययूडीएफ’ची वाढ याहूनही थक्क करणारी आहे, असेही जनरल रावत म्हणाले होते. ‘एआययूडीएफ’चे आज आसाममध्ये १३ आमदार असून, लोकसभेवर पक्षातर्फे तीन जण निवडून गेले आहेत.लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यास जोरदार आक्षेप घेत ‘एआययूडीएफ’चे प्रमुख व खा. मोहम्मद बद्रुद्दिन अजमल यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, जनरल रावत यांनी राजकीय विधान करावे हे धक्कादायक आहे. लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित एखादा राजकीय पक्ष भाजपापेक्षा अधिक वेगाने वाढत असेल तर त्याची लष्करप्रमुखांना चिंता वाटण्याचे कारण काय? प्रस्थापित मोठ्या पक्षांच्या कुशासनामुळे ‘आप’ आणि ‘एआययूडीएफ’सारखे पक्ष वाढत आहेत. त्यांनी हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही टॅग केले आहे.‘आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खा. असाउद्दिन ओवेसी यांनीही लष्कर प्रमुखांनी राजकीय विषयात नाक न खुपसता आपले काम करावे, असे सुचविले आहे. टिष्ट्वटमध्ये ओवेसी यांनी लिहिले की, जनरल रावत यांनी अशी विधाने करावीत, याचे आश्चर्य वाटते. त्यांनी राजकीय बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये. राजकीय पक्षांच्या वाढीवर भाष्य करणे हे त्यांचे काम नाही. लोकशाहीत व राज्यघटनेनुसार राजकीय पक्षांना काम करण्याची मुभा आहे. लोकांनी निवडून दिलेल्या राजकीय नेतृत्वाच्या हाताखाली काम करणे एवढेच लष्कराचे काम आहे.आसाममध्ये मुस्लिमांचे स्थलांतर नवे नाही. फार पूर्वीपासून अहोम वंशाच्या लोकांप्रमाणेच मुस्लीम तिथे येत राहिले आहेत. आसामच्या आठ जिल्ह्यांत मुस्लीम बहुसंख्य झाले आहेत. फरक एवढाच आहे की, आता होत असलेल्या घुसखोरीला पूर्वेकडील (बांगलादेश) व उत्तरेकडील (चीन) शेजाºयांची फूस आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल. लोकसंख्येचे चित्र बदलणे शक्य नसले तरी बाहेरून येणाºया या लोकांना समरस करून घेणे हे मोठे आव्हान आहे, असेही जनरल रावत यांचे म्हणणे होते.
राजकीय विधानामुळे लष्करप्रमुखांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:34 AM