नवी दिल्ली : मुस्लीम असूनही टीव्हीवरील गायन स्पर्धेच्या एका रिअॅलिटी शोमध्ये हिंदू भक्तिगीत म्हटल्याबद्दल सुहाना सईद या कर्नाटकमधील एका तरुण गायिकेला समाजमाध्यमांत कडवट टीकेला सामोरे जावे लागले.एका लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोच्या कन्नड आवृत्तीच्या ४ मार्च रोजी झालेल्या पात्रता फेरीत शिवमोगा जिल्ह्यातील २२ वर्षांच्या सुहाना हिने ‘गज’ या चित्रपटातील ‘श्रीकरणे’ हे बालाजी स्तुतीगीत म्हटले. स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ तिच्या गानकौशल्याचे कौतुक न करता तिने हे गाणे निवडून सामाजिक ऐक्याचा जो संदेश दिला, त्याबद्दलही तिचे अभिनंदन केले. सुहानाची पुढील फेरीसाठी निवडही झाली.परंतु तिचे हे गाणे कर्नाटकमधील मुस्लीम समाजातील एका वर्गास अजिबात पसंत पडले नाही. ‘मंगलोर मुस्लीम’ या गटाने फेसबूकवर कन्नडमध्ये टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘सुहाना तू पुरुषांच्या समोर गाऊन मुस्लीम समाजास बट्टा लावला आहेस. असे करून फार मोठी बहादुरी गाजविलीस असे समजू नकोस; सहा महिन्यांत संपूर्ण कुरआन मुखोद््गत करणाऱ्यांची कामगिरी याहून मोठी असते. आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन परपुरुषांसमोर करण्याचे संस्कार तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर केले. तुझ्या या वागण्याने त्यांना स्वर्गात जागा मिळणार नाही. तुला लाज नाही तर ‘पर्दा’ (बुरखा) तरी कशाला घेतेस? तो काढून टाक’.काही वेळाने याच गटाने फेसबूकवर दुसरे पोस्ट टाकले व सुहानावर व्यक्तिगत टीका करण्याचा आपला हेतू नाही. पण तिचे हे वर्तन एका मोठ्या कुटिल कारस्थानाचा भाग असल्याचा त्यांनी आरोप केला. या गटाने नंतर ही दोन्ही पोस्ट फेसबूकवरून काढून टाकली. महिला हक्क कार्यकर्त्या वृंदा अडिगे या मात्र सुहानाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सुहानाला आपल्या मनाप्रमाणे मागण्याचा पूर्ण हक्क आहे व तिने अशा टीकेकडे लक्ष देऊ नये, असे त्या म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)माझ्याकडे पाहून त्यांची भीड चेपेलया टीकेनंतर स्वत: सुहाना हिने कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र टीव्ही शोमध्ये परीक्षकांनी कौतुक करून तिला मनोगत व्यक्त करण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली होती की, अनेकांकडे प्रतिभा असूनही बहुधा सामाजिक दबावांमुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. पण माझ्याकडे पाहून त्यांची भीड चेपेल व ते पुढे येऊ शकतील, असे वाटते.
भक्तिगीतामुळे मुस्लीम गायिकेवर टीका
By admin | Published: March 10, 2017 12:25 AM