नवी दिल्ली : इशरत जहां चकमकप्रकरणी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी देण्याआधी गृहमंत्रालयाने सीबीआयकडून यासंदर्भातील दस्तऐवज मागवणे गैर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे़ हा प्रकार तपास संस्थेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे़इशरत जहांप्रकरणी गृहमंत्रालयाची भूमिका पूर्णत: चुकीची आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम़ वीरप्पा मोईली यांनी सांगितले.अधिकृत सूत्रांनी सांगितले, योग्य विचार करूनच याप्रकरणी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध खटला चालविण्याची परवानगी देण्यात येईल़ दरम्यान, गृहमंत्रालयाला दस्तऐवज द्यायचे की नाही, यासंदर्भात सीबीआयने कायदेशीर सल्ला घेण्याची तयारी चालवली असल्याचे समजते़ इशरत जहां कथित बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने विशेष संचालक राजिंदर कुमार (सेवानिवृत्त) आणि अन्य तीन अधिकाऱ्यांविरुद्ध खटल्याची परवानगी मागितली आहे़ याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
इशरत जहांप्रकरणी गृहमंत्रालयाच्या भूमिकेवर टीका
By admin | Published: June 11, 2014 11:49 PM