नवी दिल्ली, दि. 12 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कलेच्या युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. यावर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला आहे. संबित यांनी ट्विट केले की, राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन देशाविरोधात टीकेचा सूर आळवत आहेत, जे त्यांच्यातील नैराश्य दर्शवत आहे.
नेमके काय म्हणाले राहुल गांधी ?राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नोटाबंदी, धोरणे, परदेशी धोरणं, जीएसटी, राजकारण यावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काश्मीर मुद्दा, वाढता हिंसाचारावरुनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले. हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर टीका केली. शिवाय,'हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरू आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,' या शब्दांमध्ये राहुल गांधींनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले.
...तर पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार - राहुल गांधी दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी पहिल्यांदाच म्हटले आहे की, पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास मी तयार आहे. शिवाय, 2012मध्ये काँग्रेस पक्षामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि पक्षानं जनतेशी संवाद कमी केला, ज्यामुळे लोकं दुरावली. लोकांसोबतचा संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत, जनतेला कसा संदेश द्यावा? याची त्यांना चांगलीच माहिती आहे. मात्र ते भाजपा नेत्यांचंही कधी ऐकत नाहीत. स्वच्छ भारत एक चांगली कल्पना आहे, मलाही ती आवडली. आज रशिया पाकिस्तानला शस्त्रं विकत आहे, जे याआधी कधीही झाले नाही. नेपाळ, श्रीलंका, मालदीवमध्ये चीनचा दबदबा वाढत आहे. परदेश नीतीमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. अमेरिकेसोबत मैत्री करणं गरजेचं आहे मात्र दुस-या देशांसोबतही मैत्री करणं तितकंच गरजेचं आहे.
घराणेशाहीवर राहुल गांधी म्हणाले...भारतात बहुतांश राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीची समस्या आहे. यावरुन केवळ आमच्यावरच निशाणा साधण्यात येऊ नये. घराणेशाहीचं उदाहरण देताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यासहीत अभिषेक बच्चन यांच्याही नावाचा उल्लेख केला. अंबानी आपला बिझनेस चालवत आहेत इन्फोसिस त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. तर एकूण भारतात हे असेच चालतच आले आहे. मला काँग्रेस पक्षात बदल हवे आहेत. जर तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये पाहिले तर मोठ्या संख्येत अशी लोकं आहेत, जी घराणेशाहीपासून आलेली नाहीत. पण काही असेही आहेत ज्यांचे वडील, आजोबा-आजी राजकारणात होते. मी यावर काहीही करू शकत नाही. मात्र खरा प्रश्न असा आहे की संबंधित व्यक्ती सक्षम आहे का? संवेदनशील आहे का? हा खरा प्रश्न आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
भाजपानं राजकीय फायद्यासाठी काश्मीरचं केले नुकसान काश्मीर मुद्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की, 9 वर्षे मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम, जयराम नरेश यांच्यासोबत काश्मीर मुद्यावर काम केले. जेव्हा मी या कार्यासाठी सुरुवात केली तेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात होता. 2013मध्ये मी मनमोहन सिंह यांची गळाभेट घेऊन म्हटले की काश्मीरमधील दहशतवाद कमी करणे हे तुमचे खूप मोठे यश आहे. पण आम्ही यावर भाषणं केली नाहीत. आम्ही तेथील पंचायत राजवर काम केलं, स्थानिक पातळीवर लोकांसोबत संवाद साधला. जर आज काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक माझ्याशेजारी उभे आहेत, म्हणजे काश्मीरमध्ये काहीही सुरळीत नाही. मात्र 2013मध्ये माझ्यासोबत सुरक्षा रक्षक नाही तर लोकं उभी होती. 2014 मध्ये काश्मीरमध्ये पुन्हा सुरक्षा रक्षकांची गरज भासू लागली. काश्मीरमध्ये अनेक पक्ष आहेत. पीडीपीनं नवीन लोकांना राजकारणात आणण्याचं काम केले. मात्र भाजपासोबत युती झाल्यानंतर या गोष्टी बंद झाल्या. आता तिच युवापिढी दहशतवाद्यांकडे वळत आहे. भाजपानं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काश्मीरचं नुकसान केले आहे.