नवी दिल्ली : निवडणूक आयोगाला येत्या जुलै महिन्यात ३० हजार नव्या पेपर ट्रेल (मतदाराला त्याने कोणाला मत दिले हे दाखवणारी चिठ्ठी) मशीन्स (व्हीव्हीपीएटी) मिळणार आहेत. यावर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार असून त्यात सगळ््या मतदान केंद्रांवर या पेपर ट्रेल मशीन्सचा वापर होईल. निवडणूक आयोगाकडे सध्या असलेल्या या पेपर ट्रेल यंत्रांमध्ये या नव्या ३० हजार यंत्रांची भर पडेल.आमच्याकडे सध्या ५३,५०० व्हीव्हीपीएटी यंत्रे असून, येत्या तीन महिन्यांत आणखी ३० हजार नवी यंत्रे आम्हाला उपलब्ध होतील. जवळपास ८४ हजार यंत्रे गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मतदान केंद्रांसाठी पुरेशी आहेत, असे आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. एकूण १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेची मुदत येत्या २२ जानेवारी रोजी तर ६८ सदस्यांच्या हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत ७ जानेवारी रोजी संपत आहे. या दोन्ही निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होऊ शकतील.व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) हे उपकरण ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला जोडण्यात आले आहे. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले ते त्यालाच मिळाले आहे हे या चिठ्ठीवरून दिसते. द इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ईव्हीएम्स आणि व्हीव्हीपीएटीएसचे निवडणूक आयोगासाठी उत्पादन केले आहे. आयोगाला २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपीएटीचा वापर सगळ््या मतदान केंद्रांवर करायचा असेल तर त्याला आणखी १६ लाख १५ हजार यंत्रे लागतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)सर्वच विरोधकांची होती मागणीईव्हीएममध्ये छेडछाड होते हा संशय दूर करण्यासाठी किती तरी राजकीय पक्षांनी या व्हीव्हीपीएटी यंत्रांचा वापर करण्याचा जोरदार आग्रह केलेला आहे. मतदान व निवडणुकीत पारदर्शकता येण्यासाठी १६ राजकीय पक्षांनी नुकतीच निवडणूक आयोगाकडे मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मागणी केली होती. ईव्हीएम्समध्ये गडबडी झाल्याचा मुद्दा उपस्थित करून बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी व काँग्रेसने आयोगावर जोरदार हल्ला केला होता. आयोगाने अतिरिक्त ६७ हजार पेपर ट्रेल यंत्रांसाठी आॅर्डर २०१५ मध्ये दिली होती. त्यातील ३३,५०० यंत्रे मिळाली आहेत.
आयोगाला जुलैमध्ये मिळणार ३० हजार व्हीव्हीपीएटी यंत्रे
By admin | Published: April 21, 2017 2:06 AM