काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:21 AM2024-12-04T06:21:49+5:302024-12-04T06:22:18+5:30
काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
आदेश रावल
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस सातत्याने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहे. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
निवडणूक आयोग आता या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेस पक्षाला लेखी पाठवणार आहे. परंतु निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाची आकडेवारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
आयोगासमोर म्हणणे मांडल्यानंतर सिंघवी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही आमचे मत तपशीलवार मांडले आहे. गंभीर मुद्द्यांवर डेटा प्रसिद्ध करायला हवा होता. लाखो लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मागितली आहे. जेणेकरून नावे का व कशी काढली गेली हे कळू शकेल.
काँग्रेसचे सवाल
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला विचारले की, मतदार यादीत मोठी घसरण झाली आहे. विधानसभेच्या दृष्टीने ही आकडेवारी द्या आणि याचे कारण काय आहे? गेल्या पाच महिन्यांत ४७ लाख नवीन मतदार कसे जोडले गेले, असा सवालही काँग्रेसने केला. पाच वाजल्यानंतर सात टक्के अधिक मतदान कसे होऊ शकते? असा सवालही शिष्टमंडळाने केला.