ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - दगडफेक करणाऱ्या जमावाला थोपवण्यासाठी लष्कराने एका काश्मिरी युवकाला गाडीच्या बोनेटवर बांधून फिरवले होते. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत या पीडित तरुणाला राज्य सरकारने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश जम्मू आणि काश्मीर मानवाधिकार आयोगाने दिला आहे.
श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील बीरवाह भागामध्ये ९ एप्रिल रोजी उग्र जमावाकडून होत असलेल्या दगडफेकीपासून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी लष्कराने फारुख अहमद डार या स्थानिक तरुणाला जीपला बांधले होते. दगडफेक करणाऱ्या जमावापासून संपूर्ण युनिटचा बचाव करण्यासाठी मेजर नितिन गोगोई यांनी हा निर्णय घेतला होता. अधिक वाचा( कश्मिरी तरूणाला जीपला बांधणा-या "त्या" मेजरचा सन्मान )( त्या अधिकाऱ्याचा सन्मान करून लष्कराने दिला रोखठोक इशारा )
मात्र या कृतीवर टीका झाल्यावर या प्रकरणात पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 342 (चुकीच्या पद्धतीने एखाद्याला कारावासात ठेवणे), 149 (गुन्ह्यासाठी बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 367 (अपहरण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारने मेजर गोगोई यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच लष्करानेही जवानांवर होणाऱ्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी एका काश्मिरी तरुणाला जीपसमोर बांधून फिरवणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) कॉमंडेशनने सन्मानित केले होते. लष्कराने गोगोई यांच्यावर होत असलेल्या टीकेला झिडकारून लावत त्यांचा सन्मान केला होता.