Sambhal Jama Masjid : संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मस्जिद समितीच्या मागणीनुसार, मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठासमोर उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
मशीद समितीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, 19 नोव्हेंबर रोजी संभल न्यायालयात मशीद हरिहर मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच दिवशी दिवाणी न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी केली आणि मशीद समितीची बाजू न ऐकता सर्वेक्षणासाठी अधिवक्ता आयुक्तांची नियुक्ती केली. अधिवक्ता आयुक्तही 19 नोव्हेंबरला सायंकाळी सर्वेक्षणासाठी दाखल झाले. 24 नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. ज्या वेगाने सर्व काही घडले, त्यामुळे लोकांमध्ये संशय पसरला आणि ते घराबाहेर पडले. जमाव चिघळल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला आणि 6 जणांचा मृत्यू झाला.
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, शाही जामा मशीद 16व्या शतकापासून तेथे आहे. अशा जुन्या धार्मिक वास्तूंचे सर्वेक्षण करण्याचा आदेश प्रार्थना स्थळ कायदा आणि प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळ कायद्याच्या विरोधात आहे. हे सर्वेक्षण आवश्यक होते, तर दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एका दिवसात सर्वेक्षण व्हायला नको होते.
CJI यांच्या खंडपीठासमोर सुनावणी संभलच्या दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी मागणी मशीद समितीने केली आहे. पाहणी अहवाल तूर्तास सीलबंद लिफाफ्यात ठेवावा. सर्वोच्च न्यायालयानेही अशा धार्मिक वादात दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय सर्वेक्षणाचे आदेश देऊ नयेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठासमोर उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.