हरीश गुप्ता नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे विरोधी एकजुटीचा नवा फॉर्म्युला विकसित करत आहेत. कारण, अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारच्या संबंधांना विरोध करत आहेत. आतापर्यंत ज्या नेत्यांशी नितीशकुमार यांनी संवाद साधला आहे त्यांना सांगितले आहे की, काँग्रेसशिवाय एकजूट होऊ शकत नाही.
लोकसभेच्या ४०० जागांवर भाजपच्या विरोधात सर्वांचा एकच उमेदवार उभा करण्याची नितीशकुमार यांची योजना आहे. जर आघाडी झाली नाही तर जागांबाबत तडजोड होऊ शकते. उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. २०१९च्या निवडणुकीत भाजपला ३००पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या कारण, विरोधी पक्ष विभागलेला होता. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि अन्य मोठ्या राज्यात छाप पाडू न शकलेल्या भाजपने हे यश मिळविले होते. विरोधी पक्षांनी तिरंगी, चौरंगी लढती टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, काँग्रेसने २०१९मध्ये जवळपास ४७५ जागा लढल्या आणि केवळ ५२ जागा जिंकल्या. जवळपास २२० जागा अशा आहेत जिथे काँग्रेस हा भाजपचा मुख्य विरोधक आहे. अनेक राज्यात एकत्र लढण्याचा फॉर्म्युला राबविणे नितीशकुमार यांच्यासाठी कठीण काम आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, ४०० लोकसभा मतदारसंघात एकजूट होऊ शकते.
कोणत्या राज्यात काय परिस्थिती?बिहार, झारखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाममध्ये काँग्रेसचे सहकारी पक्ष आहेत. तर, सपा आणि जद (एस) यांच्याशी चर्चा सुरू आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस केरळात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. मात्र, तेलंगणात के. चंद्रशेखर राव, प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि ओडिशात नवीन पटनायक हे नेते काँग्रेसला सोबत घेण्याच्या विरोधात आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती आणि आपचे अरविंद केजरीवाल हे एकटेच निवडणूक लढवितात. त्यांना सोबत आणणे कठीण काम आहे.
सोनिया गांधी यांच्या प्रतीक्षेत विरोधी पक्ष
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी २४ ऑगस्टपासून इटलीमध्ये आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे नेते अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उर्वरित नेत्यांसोबत चर्चा केली. सोनिया गांधी विदेशात असल्यामुळे नितीशकुमार आणि त्यांची चर्चा होऊ शकली नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नियमित तपासणीसाठी विदेशात गेलेल्या आहेत. याच काळात त्यांच्या आईचे निधन झाले. नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अन्य विरोधी पक्षांना सोनिया गांधी परतण्याची प्रतीक्षा आहे. जेणेकरून, पुढील रणनीती तयार करता येईल. त्या लवकरच परततील, अशी अपेक्षा आहे.