मुंबई, दि. 18 - नोटाबंदीनंतर सरकारने हजार रुपयांची नोट चलनातून कायमची हद्दपार केली असली, तरीही सर्वसामान्यांना ती पुन्हा चलनात यावी, असे वाटते. ‘Way2Online’ या मीडिया कंपनीने केलेल्या सुमारे दोन लाख लोकांच्या ऑनलाइन सर्वेक्षणात हे निष्पन्न झाले आहे. सर्वेक्षणात 69 टक्के भारतीयांना याबाबत सकारात्मक मते नोंदविली आहेत.नव्याने चलनात आणलेल्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांमध्ये खूपच अंतर असल्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासत असल्याचे अनेक लोकांनी सांगितले. मोठ्या रकमेच्या नोटांमुळे व्यवहार करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, असे 62 टक्के लोकांनी सांगितले. मात्र 38 टक्के लोकांनी त्यांना सुट्टे पैसे मिळण्यात अडचण आली नाही, असे सांगितले आहे. दरम्यान, नव्याने चलनात आलेल्या 200 रुपयांच्या नोटेमुळे सुट्ट्यांची समस्या सुटण्यास साहाय्य होईल, असेही 67 टक्के लोकांनी म्हटले आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट चलनात आणली आहे. 200 रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार आहे. त्याचबरोबर, येत्या काही दिवसांत 100 रुपयांचे नाणे सुद्धा चलनात येणार असल्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.
जाणून घ्या 100 रुपयांच्या नाण्याची वैशिष्ट्ये ....-100 रुपयांच्या नाण्याचा आकार 44 मिलीमीटर. - हे नाणं चांदी, कॉपर, निकल आणि झिंक यांचं मिश्रण असणार आहे. - नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. - या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. -अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल.- वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे. - दुसरीकडे 5 रुपयाच्या नाण्याचा आकार 23 मिलीमीटर असेल.