सध्या देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दरम्यान कर्नाटकात गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील मांड्या येथे गणेश विसर्जनाच्यावेळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये वाद झाला आणि हिंसाचाराची घटना घडली. यावेळी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ अशा घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली.
ही घटना बुधवारी रात्री म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळ घडली. गणेश विसर्जनाच्यावेळी दगडफेक आणि हिंसक हाणामारी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या दगडफेकीनंतर काही लोकांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याजवळ रात्रभर निदर्शने केली. तसेच, दगडफेक आणि मारामारीत एका पोलिसासह काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?बदरिकोप्पलु गावातील तरुण बुधवारी गणपतची विसर्जन मिरवणूक काढत होते. यावेळी मिरवणूक नागमंगलाच्या म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळून काढण्यावरून दोन गटातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे वातावरण बिघडलं आणि वाद वाढला. याचवेळी काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहने पेटवली. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. तर संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत या प्रकरणात जबाबदार असलेल्या लोकांना अटक करावी अशी मागणी केली.
सूरतमध्येही असाच प्रकार घडला होतागुजरातच्या सूरतमध्येही असाच प्रकार घडला होता. सूरतमध्ये एका गणपती मंडपावर समाजकंटकांनी दगडफेक केली होती. या घटनेनंतर संतापलेले लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी २७ जणांनाही अटक करण्यात आली होती.