मध्य प्रदेशातील रतलाम येथे आता दोन गटांत जबरदस्त वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. एका मंदिरासमोर डीजे वाजविल्यामुळे हा वाद निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी तुंबळ दगडफेकही झाली. यानंतर पोलीस तत्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
ही घटना ताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटडी गावात घडल्याचे बोलले जात आहे. या भागातून निकाहची मिरवणूक काढली जात होती. एका गटाने आरोप केला आहे, की या मिरवणुकीदरम्यान मंदिरासमोर डीजेवर अश्लील गाणे वाजवले जात होते. यावरूनच हा संपूर्ण वाद निर्माण झाला. पाहता पाहता हा वाद एवढा वाढला, की दोन्ही गट समोरासमोर आले.
यानंतर दोन्ही बाजूंनी जबरदस्त दगडफेक झाली. यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच, संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमूख नागेश यादव पोलिसांचे पथक घेऊन गावात पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जवळपासच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या दगडफेकीत 4 जण जखमी झाले आहेत. तर 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना ताल आणि आलोट येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यांपैकी एकाला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
येथील जाकीर मेव यांच्या मुलाचे लग्न गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये झाले होते. त्याच्या लग्नाची मिरवणूक आता काढण्यात आली होती. याच मिरवणुकी दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.