Communal Violence: आधी रामनवमी आणि आता हनुमान जन्मोत्सव; लाउडस्पीकर वादामुळे होतोय हिंसाचार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 11:34 AM2022-04-17T11:34:21+5:302022-04-17T11:34:56+5:30
Communal Violence: गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. देशातील वातावरण बिघडण्यामागे हाच वाद असल्याचे मानले जात आहे.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांत झालेल्या हिंसाचारावरुन देशातील जातीय तणाव(Communal Violence) वाढत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दगडफेक, जाळपोळ अशा घटना समोर आल्या होत्या. कालही हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजातील लोक आमनेसामने आले. यादरम्यान, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली.
लाउडस्पीकर वादाचे पडसाद?
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्यास विरोध सुरू आहे. लाऊडस्पीकरवर अजान वाजवणे बंद केले नाही, तर दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसाही वाजवू, असे अनेक पक्षांचे नेते म्हणत आहेत. देशातील वातावरण बिघडण्यामागे लाऊडस्पीकरचा वाद असल्याचे मानले जात आहे.
शनिवारी काय झाले?
शनिवारी नवी दिल्लीतील जहांगीरपुरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजाचे लोक आमनेसामने आले. वातावरण इतके बिघडले की, वादाचे रुपांतर दंगलीत झाले. जहांगीरपुरीच्या कुशल सिनेमाजवळून हनुमान जयंतीची मिरवणूक जात असताना हा गोंधळ झाला. हिंसाचारादरम्यान अनेक वाहनांना आग लावण्यात आली. दगडफेक करणाऱ्या जमावाच्या हातात काठ्या आणि तलवारीही दिसत होत्या. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात 6 पोलिसांसह 7 जण जखमी झाले आहेत.
रामनवमीला गदारोळ झाला
यापूर्वी देशातील अनके शहरांमध्ये रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकांवरही दगडफेकीसह जाळपोळ करण्यात आली होती. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांत जातीय तणाव दिसून आला. या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातून लाउडस्पीकर वादाला सुरूवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी महाराष्ट्रातील मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती. त्यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर मशिदींसमोरील लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात करतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी दिली आहे. तिकडे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकमधील भाजप नेतेही मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत आहेत.