हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर राज्यसभेत मणिपूरबाबत मौन सोडले. राज्यात वर्षभरापासून सुरू असलेला वांशिक हिंसाचार कमी झाला आहे. आता शांततेची आशा करणे शक्य आहे. केंद्र आणि राज्य प्रशासन शांतता प्रस्थापित करण्यास सर्व संबंधितांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यापूर्वीच विरोधकांनी सभात्याग केला.
मणिपूरमधील बहुतांश भागांमध्ये व्यवसायांसह शैक्षणिक संस्था उघडल्या आहेत. राज्यात पूर्ण शांतता नांदावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे मोदी संसदेच्या संयुक्त बैठकीतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना म्हणाले. मणिपूरमध्ये ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आणि ११००० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः मणिपूरमध्ये राहून शांततेच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले, असे मोदींनी सांगितले.
मणिपूर विकासाच्या दिशेने पुढे जाईलपंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले. महिलांवर भयंकर गुन्हे घडले आणि हे निषेधार्ह आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मी सर्व नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो की आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच शांतता प्रस्थापित होईल. मणिपूर लवकरच विकासाच्या दिशेने नवीन आत्मविश्वास घेऊन पुढे जाईल.
आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न नको"आपण सर्वांनी राजकारण दूर ठेवून तेथील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. त्याचबरोबर असंतुष्टांना चिथावणी देणे आणि मणिपूरची सुरक्षा परिस्थिती आणखी धोक्यात आणणे थांबवावे, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कोणी करू नये, एक वेळ अशी येईल की मणिपूरच अशा लोकांना नाकारेल," असा इशाराही मोदींनी दिला. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की मणिपूरमधील सामाजिक संघर्षाची मुळे खोलवर रुजलेली आहेत, ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १९९३ पासून मणिपूरमध्ये पाच वर्षे चाललेल्या सामाजिक संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला.
काँग्रेस म्हणते... पंतप्रधानांचा दावा आश्चर्यजनक; मणिपूरकडे दुर्लक्षमणिपूरमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असताना तेथे परिस्थिती सामान्य आहे, असा आश्चर्यजनक दावा पंतप्रधानांनी राज्यसभेत केला असा आरोप काँग्रेसने केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हिंसाचार भडकल्यापासून पंतप्रधानांनी अद्याप राज्याला भेट दिली नाही, याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, या मुद्द्यावर अनेक महिने मौन पाळल्यानंतर आज राज्यसभेत पंतप्रधानांनी मणिपूरमधील परिस्थिती सामान्य असल्याचा धक्कादायक दावा केला. प्रत्यक्षात अंतर्गत मणिपूर मतदारसंघाच्या खासदाराने १ जुलै रोजी लोकसभेत निदर्शनास आणून दिल्यानुसार परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. मणिपूरकडे पंतप्रधान दुर्लक्ष करत आहेत, असे दिसते, असा आरोपही काँग्रेसने केला.