भोपाळ : येथील मध्यवर्ती कारागृहातून सिमीच्या आठ अतिरेक्यांचे पळून जाणे आणि त्यानंतर काही तासांतच पोलीस चकमकीत ते ठार होणे, याबद्दल संशय व्यक्त केला जात असून, त्यावर आता देशभर राजकारण सुरू झाले आहे.पोलिसांची चकमक खरी होती का, याविषयीच काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट, मजलिस-ए-मुसलमीन तसेच बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली आहे. चकमकीचा जो व्हिडीओ प्रसारित झाला आहे, त्यामुळे अधिकच संशय बळावला आहे. ते आठही जण शरण येण्यास तयार असताना त्यांना ठार करण्यात आले, असे त्यातून दिसत आहे. भाजपा व मध्य प्रदेश सरकारने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या कारवाईबद्दल विरोधी पक्षांनी याप्रकारे शंका घेणे चुकीचे आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. या अतिरेक्यांनी पळून जाताना तुरुंगातील एका पोलिसाचीही हत्या केली होती.
सिमी संशयितांच्या एन्काउंटरचे राजकारण सुरू
By admin | Published: November 02, 2016 6:49 AM