पुणे : स्त्रिया आणि दलित हे समाजातील दोन्ही प्रवाह नेहमी दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांचा आवाजही कायम दाबला गेलेला आहे. नितीन आगेचे खून प्रकरण त्या मानसिकतेतूनच घडले आहे. जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.लोकायत, पुणे जिल्हा मोलकरीण संघटना, श्रमिक महिला मोर्चा, मासूम, युवक क्रांती दल, मिळून सार्याजणी, नारी समता मंचया समविचारी संघटनांच्यावतीने खर्डा येथील जातीय अत्याचारविरोधी घटनेच्या विरोधात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेधा थत्ते, सुनीती सु. र., अतुल पेठे, मारूती भापकर, अन्वर राजन, मुकुंद किर्दत, नीरज जैन, मकरंद साठे उपस्थित होते. पुन्हा पुन्हा अशा सभा घेण्याची वेळ येणे ही चांगली गोष्ट नाही. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणार्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांनी साक्ष देण्यासाठी पुढे यावे असे विद्या बाळ यांनी स्पष्ट केले.मारूती भापकर म्हणाले, 'दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर लाखोंच्या संख्येने तरूण-तरूणींनी पुढे येऊन प्रशासनाला घाम फोडला होता. त्याप्रमाणे आताही जातीवादाच्या विरोधात तरूण-तरूणींनी मोठया संख्येने एकत्र यावे. आता खेडयांकडे जाऊन लोकांमध्ये फुले व आंबेडकरांचे विचार रूजविण्याची आवश्यकता आहे.'नितीन आगे याच्या खूनानंतर प्रस्थापित व्यवस्थेने बाळगलेलं मौन सर्वाधिक त्रासदायक आहे. जातीचे किल्ले पाडायला आता सर्वांनी सिध्द झाले पाहिजे असे सुनिती सु. र. यांनी सांगितले. अतुल पेठे म्हणाले, 'फँ ड्री जिथे संपते तिथे नितीन आगेचे प्रकरण पुढ सुरू होते. २०१४ च्या वर्षात घडलेल्या या घटनेमुळ शरमेने मान खाली जाते आहे. या घटनेने दलितांबरोबरच मुलींनाही एक इशारा दिला गेला आहे. स्वत:च्या मर्जीने कुठल्याही तरूणाच प्रेमात पडाल तर तुमची अवस्था अशी होईल असा गर्भित अर्थ यामध्ये सामावलेला आहे.'पुन्हा पुन्हा या घटना घडणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अन्वर राजन यांनी स्पष्ट केले. लेखक व साहित्यिकांनी या घटनेविरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता असल्याचे मकरंद साठे यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहांना समाजाने आधार द्यावा
By admin | Published: May 07, 2014 9:49 PM