नवी दिल्ली- पहेले मे बहोत मोटा था, लेकीन ये गोलिया लेने के बाद मै पतला हुआ.. असे किंवा अशा अनेक प्रकारच्या जाहिराती आपण ऐकल्या असतील. त्यांना फोन करुन ऑर्डरही दिल्या जातात. पण वजन कमी करुन देण्याचे आश्वासन देणाऱ्या कंपन्यांकडून फसवणूक झालेलेही अनेक असतात. पण खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीच काल राज्यसभेत आपलीही या कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचा अनुभव सांगितला.राज्यसभेत समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी कंपन्यांच्या खोट्या जाहिरातींमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल चर्चा सुरु केली. त्यानंतर नायडू यांनी आपलीही फसवणूक झाल्याचे सदस्यांना सांगितले, "उपराष्ट्रपती झाल्यावर आपण 28 दिवसांमध्ये वजन कमी करण्याचे आश्वासन देणारी जाहिरात पाहिली आणि त्यासाठी 1230 रुपये पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या पत्त्यावर एक पाकीट आले, ते उघडल्यावर त्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत खऱ्या औषधासाठी आणखी 1000 रुपये पाठवावेत असे लिहिले होते". कंपनीकडून अशी फसवणूक झाल्यावर त्यांनी केंद्रीय कंझ्युमर अफेअर्स मंत्रालयाचे मंत्री रामविलास पासवान यांना पत्र लिहून याची माहितीही दिली होती.पासवान यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर ही कंपनी अमेरिकेतील असल्याचे समजले होते. याबाबत बोलताना नायडू यांनी, " अशा जाहिरातींबाबत काहीतरी करायला हवे" असे सभागृहात सांगितले.
वजन कमी करुन देण्याच्या खोट्या जाहिराती करणाऱ्या कंपन्यांनी मलाही फसवले- उपराष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 12:10 PM