नवी दिल्ली : ग्राहकांना त्रस्त करणाऱ्या ‘कॉल ड्रॉप’च्या समस्येवर मात करण्यासाठी येत्या वर्षभरात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात एक लाख नवे मोबाइल टॉवर उभारण्याचे आश्वासन मोबाइल कंपन्यांनी दिले असून, त्याचबरोबर सरकारकडून जादा स्पेक्ट्रमची मागणी केली आहे.टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी बैठक घेतल्यानंतर दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, १०० दिवसांत ६० हजार मोबाइल टॉवर उभारण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले होते. त्यापैकी ४८ हजार टॉवर त्यांनी ४५ दिवसांत उभे केले आहेत.दूरसंचारमंत्री म्हणाले की, कंपन्यांनी त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी एक वर्षाच्या निश्चित योजनेची हमी दिली आहे. आत्तापर्यंत त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पण ग्राहकांना चांगल्या सेवेचा अनुभव येऊन त्यांनी समाधान व्यक्त करायला हवे, असे सरकारचे म्हणणे आहे.खासकरून ‘कॉल ड्रॉप’च्या विषयावर टेलिकॉम कंपन्यांसोबत सरकारने घेतलेली ही दुसरी बैठक होती. याआधी टेलिकॉम सचिव जे. एस. दीपक यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीत टेलिकॉम कंपन्यांनी १०० दिवसांची योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार कंपन्यांनी एक वर्षात एक लाख मोबाइल टॉवर उभारण्याचे ठरविले आहे. प्रत्येक टॉवरला २० लाख रुपये याप्रमाणे यासाठी एकूण २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.सरकार आजवरच्या सर्वांत मोठ्या स्पेक्ट्रम लिलावाची तयारी करीत आहे. त्याआधी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सेवा सुधाराव्यात, असा सरकारचा आग्रह आहे. या लिलावात विविध फ्रिक्वेन्सी बँडचे २३ हजार मेगाहर्स्ट्स एवढे स्पेक्ट्रम विकले जाईल व त्यातून सरकारला ५.६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.हा लिलाव येत्या सप्टेंबरमध्ये होईल व त्यामुळे देशातील स्पेक्ट्रमचा तुटवडा दूर होईल, असेही मंत्री सिन्हा यांनी कंपन्यांना सांगितले.मोबाइल कंपन्यांनी ७१ ते ७६ गिगाहर्स्ट््स व ५० गिगाहर्स्ट्स एवढ्या उच्च फ्रिक्वेन्सी बँडचा स्पेक्ट्रमही विक्रीसाठी खुला करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या फ्रिक्वेन्सी बँडमधून पुरविल्या जाणाऱ्या ब्रॉड बँड टेलिकॉम सेवांनी, आॅप्टिकल फायबरप्रमाणे, दर सेकंदाला एक गिगाबाईट एवढ्या उच्च वेगाने डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)ग्राहकांना समाधानकारक अनुभव केवळ ‘कॉल ड्रॉप’पुरताच नव्हे, तर डेटा सर्व्हिसेसच्या बाबतीतही यायला हवा. पंतप्रधानांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी टेलिकॉम सेवांमध्ये अजूनही बरीच सुधारणा व्हायला हवी. - मनोज सिन्हा, मंत्री, दूरसंचार
कंपन्या म्हणतात, वर्षभरात उभारणार एक लाख मोबाइल टॉवर
By admin | Published: July 27, 2016 12:44 AM