नवी दिल्ली, दि. 6 - महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचं तुमच्या ऐकिवात असेल. मात्र एका कंपनीनं चक्क पुरुषांना पितृत्व लाभल्यास 2 महिन्यांची सुट्टी देऊ केली आहे. ऐकून धक्का बसला पण हे खरं आहे. जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया या कंपनीनं पुरुषांसाठी दोन महिन्यांची पितृत्व रजा देण्याचं जाहीर केलं आहे.कंपनीच्या नव्या नियमानुसार पितृत्व लाभलेली व्यक्ती 8 आठवडे म्हणजेच 2 महिन्यांची पितृत्व रजा घेऊ शकते. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला कर्मचा-यांसाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा देत आली आहे. कंपनीचे एचआर हेड इंद्रजित सेनगुप्ता यांच्या मते, कर्मचा-यांच्या वैयक्तिक जीवनात आणि कामात ताळमेळ असणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे. जन्मानंतर बाळाचा खूप सांभाळ करावा लागतो. त्या दिवसांत बाळासह आईलाही आपुलकी आणि प्रेमाची आवश्यकता असते. एक पतीच स्वतःच्या पत्नीला हरेक प्रकारे मदत करू शकतो.बाळाला आंघोळ घालणं, कपडे बदलणं व मालिश करण्यासाठी पुरुष माणूस पत्नीला मदत करू शकतो. बाळ जन्माला आल्यानंतर तणावात असलेल्या पत्नीला एक नवराच तिला दिलासा देऊन मदत करू शकतो. 8 आठवड्यांची पितृत्व रजा मिळाल्यामुळे आमचे कर्मचारी जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडू शकतात, असंही कंपनीचे रिसर्च अँड डिव्हलपमेंट विभागाचे संचालक राम शुक्ला म्हणाले आहेत.
पितृत्व लाभल्यास ही कंपनी पुरुषांना देते दोन महिन्यांची सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 6:59 PM