सूरत : भारतात काही घडू शकते, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय देणारी एक घटना सूरतमध्ये घडली आहे. सूरतमधील एका भागात 'रिलायन्स जिओ'चा लोगो वापरून चक्क गव्हाचे पीठ विकणाऱ्या चौघा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सूरतमधील सचिन पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. जिओ ब्रँडचे नाव आणि लोगो वापरून गव्हाचे पीठ विकले जात होते. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली आहे. तसेच गव्हाचे पीठ विकणाऱ्या राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सूरतचे पोलीस उपायुक्त विधी चौधरी यांनी सांगितले की, सर्व आरोपींविरोधात ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिलायन्स जिओकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर, 'जिओ डाटानंतर आता जिओ आटा' अशा शीर्षकाखाली एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. जिओ ट्रेडमार्कचा वापर करून राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनी गव्हाचे पीठ विकले जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. गव्हाच्या पीठाच्या गोण्यांवर जिओचा लोगो वापरला जात असल्याचेही उघडकीस आले.
राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनीकडून गहू पीठांच्या गोण्यांवर जिओ ब्रँड नाव आणि लोगो वापरून विक्री सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजची जिओ किंवा अन्य कोणतीही कंपनी शेतीशी निगडीत नाही. संबंधित सर्वजण वित्तीय लाभासाठी जिओ ट्रेडमार्काचा दुरुपयोग करत आहेत, असेही पोलीस तक्रारीत म्हटले आहे.