पुद्दुचेरी - येत्या मे महिन्यात माझ्या नेतृत्वाखालील सरकार 48 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. आता काँग्रेसच्या 48 वर्षांच्या कारभाराशी आमच्या 48 महिन्यांच्या कारभाराची तुलना करून पाहा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुद्दुचेरी येथील श्री अरविंद आश्रमाला भेट दिली. त्यानंतर एक सभेला संबोधित केले. त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. मात्र जगात असे अनेक देश आहेत जे आमच्यानंतर स्वतंत्र होऊन देखील विकासाच्या मार्गावर आमच्या पुढे गेले आहेत. आपल्या देशातील राजकीय संस्कृती आणि सरकारी संस्कृतीमध्ये आम्ही विकासाच्या मार्गात बरेच मागे राहिलो आहोत त्याबाबत आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काँग्रेसवर मोदींचे टीकास्त्र मोदी म्हणाले, "आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर आमच्या पहिल्या पंतप्रधानांनी 17 वर्षे देशाचा कारभार सांभाळला. त्यानंतर त्यांच्या मुलीने 14 वर्षे त्यानंतर त्यांच्या मुलीच्या मुलग्याने पाच वर्षे पंतप्रधानपद सांभाळले. तर 2004 ते 2014 या काळात हे कुटुंब रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालवत होते. बेरीज केली तर एकूण 48 वर्षे एकाच कुटुंबाने देश चालवला. त्यांनी 48 वर्षे सरकार चालवले. तर या मे महिन्यात आमच्या सरकारला 48 महिने पूर्ण होणार आहेत. आता त्यांनी 48 वर्षांत काय केले आणि आम्ही 48 महिन्यांत काय केले याची तुलना देशातील विद्वान मंडळींनी करावी,"
काँग्रेसच्या 48 वर्षांशी माझ्या 48 महिन्यांच्या कारकिर्दीची तुलना करा, मोदींचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 6:11 PM