ऑनलाइन लोकमत
पटना, दि. 11- बिहार सरकार गयामध्ये रस्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारामुळे सर्वांच्या टीकेचं लक्ष्य झालं आहे. या प्रकारानंतर बिहारमध्ये जंगलराज परत आल्याची भाजपकडून जोरदार टीका झाली होती. त्याला आज बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादवनं प्रत्युत्तर दिलं आहे. पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तुलना गयामध्ये रस्त्यावर झालेल्या हल्ल्याशी करून त्याने मोदींवर शरसंधान केलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, गयामध्ये भररस्त्यात गोळ्या घालून झालेल्या हत्येमुळे भाजपनं बिहारमध्ये जंगलराज आल्याचं म्हटलं होतं. त्यावर तेजस्वीनं म्हटलं आहे की, गयामध्ये रस्त्यावर वादातून झालेल्या हत्येमुळे जंगलराज आल्याचं तुम्ही म्हणत असाल तर जानेवारीमध्ये पठाणकोट एअरबेसमध्ये झालेला हल्लाही अशाच प्रकारचा होता. ज्यामध्ये सेनेचे सात जवान शहीद झाले होते. दहशतवादी भारतातल्या सर्वात सुरक्षित एअरबेसवर हल्ला करून शकतात, तर तो जंगलराज नाही का, असं तेजस्वी यादवनं म्हटलं आहे. हरियाणातील दंगल आणि पठाणकोट हल्ला हेसुद्धा जंगलराजच असल्याचं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे. गेल्याच आठवड्यात जेडीयूची आमदार मनोरमा देवींच्या मुलगा रॉकीनं ओव्हरटेक केल्यानं भररस्त्यात एका 20 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती.