नवी दिल्ली : १ जानेवारी २०१६ पासून मोबाईल आॅपरेटर्सना कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना भरपाई देणे बंधनकारक ठरविणारा ‘ट्राय’चा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे.भारतीय सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आणि वोडाफोन, भारती एअरटेल व रिलायन्ससह २१ दूरसंचार आॅपरेटर्सद्वारा दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने ट्रायचा आदेश उचलून धरला. ‘आम्ही ट्रायच्या आदेशाची वैधता मान्य करतो,’ असे या पीठाने स्पष्ट केले. या रिट याचिका दाखल केल्यापासून आम्ही भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (ट्राय)च्या अधिसूचनेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे दूरसंचार आॅपरेटर्स १ जानेवारी २०१६ पासून हा निर्णय अमलात आणण्यास मोकळे आहेत. कायद्याच्या कलम ३६ अन्वये नियम तयार करण्याच्या ट्रायच्या अधिकाराबद्दल वाद नाही. ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच हा नियम तयार करण्यात आला आहे, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कॉल ड्रॉपसाठी भरपाईचा आदेश योग्य
By admin | Published: March 01, 2016 3:10 AM