लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिप्पणी केल्याप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. एका वकिलाने या प्रकरणी लखनऊ कोर्टात तक्रार केली आहे. याप्रकरणाची सुनावणी सात ऑक्टोबरला होणार आहे. ‘पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, त्यामुळे मला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात यावे’, असे प्रकाश राज यांनी म्हटले होते. ‘मला पुरस्कार नकोत. तुम्हीच ठेवा ते. अच्छे दिन परत येतील, अशी खोटी आशा मला दाखवू नका. मी एक प्रख्यात अभिनेता आहे, तुम्ही (मोदी) अभिनय करताना मी तुम्हाला ओळखू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? अभिनय काय आहे आणि सत्य काय हे मी ओळखू शकतो. किमान ही गोष्टी जाणून तरी काही आदर दाखवा.’
कर्नाटकामधील डाव्या विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर टीका करत निशाना साधला. बंगळुरू येथे झालेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (DYFI) बैठकीत ते बोलत होते. मोदींनी गौरी लंकेश यांच्याप्रकरणी यापुढेही मौन बाळगले तर पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा प्रकाश राज यांनी दिला. गौरी लंकेश यांना प्रकाश राज ३० वर्षांपासून ओळखत होते. गेल्या महिन्यात गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता.
‘पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे सोशल मीडियावर काही लोक समर्थन करत आहेत. सर्वांना माहित आहे की हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या लोकांना स्वत: पंतप्रधान फॉलो करतात. याची आपल्याला चिंता आहे. नेमका आपला देश कुठे चालला आहे?’, असा प्रश्न प्रकाश राज यांनी उपस्थित केला होता.
राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याइतका मुर्ख नाही, पण मोदींच्या मौनामुळे दु:ख - प्रकाश राज
आपले पुरस्कार परत करण्याइतका मी मुर्ख नाही असं प्रकाश राज बोलले आहेत. सोमवारी प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे असं वृत्त आलं होतं. प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत आपण गौरी लंकेश हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन बाळगल्याने दुखी आहोत, मात्र आपण पुरस्कार परत करणार असल्याचं बोललो नव्हतो असं सांगितलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, 'प्रकाश राज यांनी आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे अशा बातम्या पाहून मी फक्त हसू शकतो. आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करेन इतका मी मुर्ख नाही. हे पुरस्कार मला माझ्या कामासाठी देण्यात आले आहेत, ज्याचा मला गर्व आहे'.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगल्याने आपण दुखी: आहोत हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. प्रकाश राज बोलले आहेत की, 'गौरी लंकेश यांची हत्या साजरा करणा-यांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात हे फार दु:खद आहे'.