लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडा : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या एकाने कोणा सामान्य व्यक्तीविरोधात नाही तर थेट इंद्रदेवाविरोधातच तक्रार केली आहे. उल्लेखनीय म्हणजे कर्नेलगंजच्या तहसीलदारांनीही हा तक्रार अर्ज कारवाईसाठी पुढे पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज तहसीलमध्ये शनिवारी संपूर्ण समाधान दिनाचे (तक्रार निवारण) आयोजन करण्यात आले होते. यावेळी, कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या ‘झाला’ गावातील सुमित यादव या व्यक्तीने इंद्रदेवाच्या विरोधात तक्रार केली. ‘पाऊस खूप कमी होतोय. त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे. जीवजंतू आणि शेतीवर मोठा परिणाम होत आहे. घरात राहणाऱ्या महिला व लहान मुलांचेही प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे कृपया आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती’, असे त्याने तक्रार अर्जात नमूद केले होते. पाऊस पडत नाही आणि दुष्काळ पडत असल्यामुळे, असा विषय या तक्रारीचा आहे. तर इंद्रदेवता (भगवानजी) यांच्याविरोधात तक्रार असल्याचेही स्पष्ट लिहिले आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी घेतली दखल
सुमित कुमार यांची तक्रार मिळाल्यानंतर कर्नेलगंजच्या तहसीलदारांनीही हे पत्र स्वाक्षरी करून कारवाईसाठी पुढे जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले. नंतर, तक्रार पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आणि हे प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचले. जिल्हा दंडाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत पत्र न वाचता पुढे कसे केले, याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे.
न वाचताच तक्रारी पुढे ढकलतात...
अधिकारी लोकं अशाप्रकारे न वाचताच तक्रारी पुढे ढकलतात अशी चर्चा सोशल मीडियात या पत्रावरून रंगली असून हे पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर आता प्रशासकीय अधिकारी इंद्रदेवताविरोधात कारवाई कशी करणार, तक्रारकर्त्याचा प्रश्न कसा सोडवणार? यावरूनही नेटकरी मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.