मुंबई - आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अनेक बड्याबड्या नेत्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवरून योगा दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेयर केल्या होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा योगा दिनानिमित्त 'न्यू इंडिया' अशा कॅप्शनसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट केला होता. मात्र याच ट्विटमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. अटलबिहारी दुबे यांनी ही तक्रार नोंदवली आहे.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त २१ जून रोजी देशभरात योगादिन उत्साहात पार पडला.यावेळी अनेकांनी योगासने करतानाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचप्रमाणे राहुल गांधींनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'न्यू इंडिया' अशा कॅप्शनसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर राहुल गांधी हे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले.
राहुल यांनी केलेल्या ट्विट विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. अटलबिहारी दुबे यांनी ही तक्रार नोंदवली आहे. दुबे यांनी आरोप केलं आहे की, राहुल गांधी हे भारतीय सैनिकांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहे.
राहुल यांच्या ह्याच ट्विटमुळे भाजपने त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. डॉग युनिट ही भारतीय सैन्याचा एक भाग आहे. देशाच्या योगदानात त्यांची मोठी भागीदारी आहे. सैनिकांचा अपमान करणाऱ्याला देवाने सद्बुद्धि द्यावी, असा टोला रक्षामंत्री राजनाथसिंह यांनी राहुल यांना लगावला होता.