भाजपकडून सोनिया गांधींची निवडणूक आयोगाकडे तक्रार; दंडात्मक कारवाईसह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 10:41 AM2023-05-09T10:41:38+5:302023-05-09T10:42:06+5:30
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर आयोगाला निवेदनही दिले.
बंगळूरू/नवी दिल्ली : निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकसाठी ‘सार्वभौमत्व’ शब्द वापरल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर कारवाई करण्यासह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ‘सार्वभौमत्व’ हा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईची मागणीही भाजपने केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर आयोगाला निवेदनही दिले.
भाजपने म्हटले की, भारतीय संघराज्यातील राज्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणतेही आवाहन धोकादायक आणि घातक परिणामांनी भरलेले आहे. त्यामुळे अशा वक्तव्याबद्दल काँग्रेसची मान्यता रद्द करावी, अशी मागणी भाजप नेते तरुण चुघ यांनी केली.
तीन हजार लोकांशी मोदींनी साधला संवाद
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात दिवसांत डझनभर जाहीर सभांना संबोधित केले आणि अर्धा डझन रोड शो केले. या ७ दिवसांमध्ये त्यांनी जवळपास ३ हजार लोकांची भेट घेतली. यात पक्षाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांसह समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश होता.
काँग्रेसकडूनच सिद्धरामय्यांना पराभूत करण्याचा कट
मंगळुरू : निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्याने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून पराभूत होतील. काँग्रेसचा एक गट आपल्या ज्येष्ठ नेत्याविरोधात कारस्थान रचत आहे, असा आरोप त्यांनी केला.