नवी दिल्ली : नोकरी किंवा सेवेसंबंधी तक्रारी थेट पंतप्रधानांकडे घेऊन जाल तर कारवाई केली जाईल, असा इशारा सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. लष्कर आणि निमलष्कर दलाच्या अधिकाऱ्यांनाही हा नियम लागू असेल.संपर्काच्या विहित माध्यमाला फाटा देत थेट मंत्री किंवा पंतप्रधानांकडे तक्रारी घेऊन जाण्याकडे वाढता कल पाहता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी)हा इशारा दिला. निवेदन द्यायचे झाल्यास अधिकाऱ्यांना डावलून थेट संपर्काचा मार्ग अवलंबल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांना तक्रारींचा निपटारा करायचा झाल्यास अगदी लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, कार्यालय प्रमुखाकडे किंवा योग्य स्तरावर अशा बाबी हाताळणाऱ्या सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागता येईल. अगदी उच्चपदस्थांकडे अर्जविनंती करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल, असे या मंत्रालयाने आदेशात स्पष्ट केले.याआधीही त्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या असूनही निमलष्कर किंवा लष्करातील अधिकारी थेट पंतप्रधान, कार्मिक सचिव किंवा अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे धाव घेत असल्याचे आढळून येत आहे. संबंधित सूचना सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तसेच लष्कर-निमलष्कराच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असेल, असे त्यात नमूद करण्यात आले.(वृत्तसंस्था)
तक्रारी पंतप्रधानांकडे न्याल तर खबरदार !
By admin | Published: September 01, 2015 2:09 AM