नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात महत्त्वाचे विधेयके मंजूर करून घेतल्यामुळे भाजपत एकीकडे उत्साह असला तरी अनेक घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. संसदेच्या रणनीतीत आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, असा या पक्षांचा आक्षेप आहे. तथापि, या नाराजीमागे त्या-त्या राज्यातील राजकारणांचे संबंध आणि संदर्भ जोडले गेलेले आहेत. एनडीएचे घटक पक्ष प्रामुख्याने शिवसेना, तेलुगू देसम पार्टी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिरोमणी अकाली दल हे भाजपवर नाराज असून, संसदेतील रणनीती असो वा विरोधी पक्षांशी बातचीत यात आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे त्यांचे मत आहे. तेलुगू देसम पार्टीच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, भाजप आणि तेलुगू देसम पार्टी यांच्यात गत काही दिवसांपासून मतभेद सुरू झाले आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा शब्द भाजपने २०१४ मध्ये निवडणुकीच्या काळात दिला होता; पण आता सत्तेत आल्यानंतर भाजप या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. भाजपचे आंध्र प्रदेशातील राजकीय अस्तित्व तसे कमी आहे; पण तेलुगू देसम पक्षासाठी हे आश्वासन पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीसाठी पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक एक आव्हान आहे. अर्थातच, या राज्यात शिरोमणी अकाली दलाचे वर्चस्व भाजपपेक्षा अधिक आहे; पण याच पक्षाच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे सरकार चालविल्यानंतर आता आपल्याला सत्तापक्षाविरुद्ध असलेल्या लाटेचा फटका बसेल, याची भाजपला भीती आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातही कटुता निर्माण होत आहे. काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या संघर्षात आतापर्यंत पंचावनहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. भाजपसोबतच्या युतीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे मत पीडीपीच्या एका गटाकडून व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
घटक पक्ष नाराज!
By admin | Published: August 12, 2016 2:57 AM