अहमदाबाद : कोटा मुद्यावर पटेल समुदायाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सोमवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही शहरांमध्ये लोकांनी स्वत:हून व्यवहार बंद ठेवले होते, तर काही भागांत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुरतमध्ये एका २७ वर्षांच्या तरुणाने विष खाउन आत्महत्या केली, तर मेहसाणामध्ये पटेल आंदोलकांनी राज्याचे गृहमंत्री रजनी पटेल यांचे घर व मालमत्ता यांना आग लावली. अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि मेहसाणा शहरात मोबाईल आणि इंटरनेट सेवांवर बंदी असून ती मंगळवारपर्यंत उठविली जाण्याची शक्यता आहे. या तिन्ही शहरांमध्ये बंदचा अत्यल्प प्रभाव दिसला. मेहसाणा शहरात रविवारी पटेल समुदायाने जेल भरो आंदोलन पुकारत पोलिसांशी दोन हात केले होते. तेथे केवळ पटेल समुदायाचे वर्चस्व असलेल्या भागातच बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संध्याकाळनंतर बंद मागे घेण्यात आला. त्यानंतर राज्यात सर्वत्र शांतता असून, काही भागात मात्र तणाव कायम आहे. मेहसाणा शहरात रविवारी उफाळलेल्या हिंसाचारानंतर सरदार पटेल गटाने बंदचे आवाहन केले होते. सोमवारी सकाळी तेथील संचारबंदी उठविण्यात आली. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक वाहतूक आणि रेल्वेसेवा सुरळीत सुरू राहिली. पोलिसांनी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला. (वृत्तसंस्था)
गुजरातेत पटेलांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: April 19, 2016 3:14 AM