नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनीही न्या. लोयांच्या मृत्यूसंदर्भात साशंकता व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालय स्वतःला ईश्वरासारखं समजत असेल तर त्यांनी न्या. लोया प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करायला हवी होती. न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू नैसर्गिक कसा ?, न्यायाधीश हे खासगी आयुष्यात न्यायाधीश नसतात. त्यामुळे ते खरंच बोलतील यावर विश्वास कसा ठेवायचा?, ते हरिश्चंद्र आहेत का ?, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मी समाधानी नाही, असं माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले आहेत. काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, न्यायाधीश लोयाप्रकरणी चौकशी समिती नेमायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे लोकांच्या मनातला संशय कमी होणार नाही. हे न्यायालय काय निर्णय देणार ते अपेक्षितच होतं, सुप्रीम कोर्टाने पत्रकार परिषद घेतलेल्या चार न्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी, असं म्हणत कुमार केतकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
* सर्वोच्च न्यायालयानं चुकीचा निकाल दिला. न्याय संस्थेसाठी हा काळ दिवस आहे. - प्रशांत भूषण, ज्येष्ठ विधिज्ञ