नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी पंजाबमधील अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला. राज्यातील शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारचे मंत्री यात गुंतल्याचा आरोप असून, याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. त्यावर सरकारने या समस्येच्या उच्चाटनासाठी पावले उचलली जात असल्याचे सांगून केवळ कोणाचे नाव घेतल्याने गुन्हा दाखल करता येत नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नामनियुक्त सदस्य केटीएस तुलसी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पंजाबमध्ये अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांची संख्या प्रचंड असून, राज्यातील १५ पैकी १३ जिल्ह्यांना या समस्येने ग्रासले आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांची दररोज ४० प्रकरणे समोर येत असून, ही संख्या संपूर्ण देशातील प्रकरणांच्या निम्मी आहे.या समस्येच्या उच्चाटनासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, युवकांवर परिणाम घडवून आणणारी कोणतीही समस्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर नाही, असे सरकारने कधीही म्हटले नाही. या समस्येच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकार सातत्याने पंजाब सरकारच्या संपर्कात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>तीन मंत्री रॅकेटमध्ये गुंतल्याचा काँग्रेसचा हल्लाअमली पदार्थांच्या तस्करीत राज्यातील एक मंत्री गुंतला असल्याकडे तुलसी यांनी लक्ष वेधले असता रिजिजू म्हणाले की, केवळ कोणाचे नाव घेणे हा खटला दाखल करण्यासाठीचा पुरेसा आधार ठरू शकत नाही. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटकेत असलेला माजी राष्ट्रीय विजेता जगदीशसिंग भोला याने प्रकाशसिंग बादल सरकारचे तीन मंत्री या रॅकेटमध्ये गुंतले असल्याचा आरोप करून त्यांच्यातील एक जण याचा सूत्रधार असल्याचे म्हटलेले आहे, असे काँग्रेसचे नेते प्रतापसिंग बाजवा यांनी सभागृहात सांगितले.
राज्यसभेत पंजाबच्या समस्येबाबत चिंता
By admin | Published: August 04, 2016 4:10 AM