चंदीगड : अमृतसरमधील सुवर्णमंदिरात झालेल्या ब्ल्यू स्टार कारवाईनंतर लष्करातून पळून गेलेल्या शिखांना सर्व आरोपांतून निर्दोष ठरवावे व त्यांना सगळे लाभ देण्यासाठी माजी सैनिक समजले जावे, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शुक्रवारी केली.
१९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींमधील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही, असे बादल यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘शीख समाजावर झालेला भयानक अन्याय मी तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी हे पत्र लिहितो आहे. दोषी लोक आजही फरार असून, पीडित कुटुंबे न्यायाची वाट पाहत आहेत,’ असे बादल म्हणाले. सुवर्णमंदिरातून १९८४ मध्ये अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन ब्ल्यू स्टार कारवाई केली होती.या कारवाईचा धक्का बसल्यामुळे ३०९ शीख सैनिकांनी त्यांचे ठिकाण सोडले होते. त्यानंतर त्यांच्यावर लष्कर सोडून गेल्याबद्दल लष्करी न्यायालयात खटला चालून त्यांना शिक्षाही झाली होती.
काय म्हणाले, सुखबीरसिंग बादल ?श्री गुरू नानक देवजी यांचे ५५० वे प्रकाश पर्व भारत सरकार साजरे करीत आहे. त्या सैनिकांनी त्यांना कारवाईचा धक्का बसल्यामुळे लष्कर सोडले होते आणि तेव्हाच्या सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे हे अतिशय गंभीर आणि अक्षम्य होते, असे बादल म्हणाले.५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने भारत सरकारने त्या सर्व सैनिकांना सर्व आरोपांतून मुक्त करून त्यांना माजी सैनिक म्हणून समजावे व माजी सैनिकाचे सगळे लाभ त्यांना द्यावेत, असे मी आवाहन करतो.बादल यांनी गुरुवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना पाकिस्तान आकारत असलेल्या शुल्काबद्दल काळजी व्यक्त केली.