नवी दिल्ली : कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनपासून होणारा संसर्ग आता देशात दिसून येऊ लागला आहे. पुढील वर्षी जानेवारी २०२२चा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या दिवसांत देशात ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांची संख्या सर्वाधिक असेल, असा दावा आयआयटी कानपूरच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य आणि उपसंचालक मनिंदर अग्रवाल यांनी केला आहे. ओमायक्रॉनची लाट जरी आली तरी तिचा प्रभाव कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे आलेल्या दुसऱ्या लाटेइतका नसेल, असे त्यांचे मत आहे. प्रा. अग्रवाल यांनी संशोधनाअंती दुसऱ्या लाटेवेळीही मांडलेली भाकिते बऱ्याच अंशी खरी ठरली होती. त्यामुळे त्यांनी ओमायक्रॉनबाबत नोंदवलेले भाकीत महत्त्वाचे आहे.
प्रा. अग्रवाल यांच्या मते ओमायक्रॉनमध्ये वेगाने संसर्ग होण्याची लक्षणे दिसत आहेत; परंतु बाधितांमध्ये याची दिसणारी लक्षणे गंभीर नाहीत. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या हर्ड इम्युनिटीला ओमायक्रॉन चकवा देईल, अशी शक्यता दिसत नाही. अग्रवाल म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे भारतात गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी आहे, कारण देशात ८० टक्के नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमयक्राॅन व्हेरिएंट आतापर्यंत जगभरातील ३० देशांमध्ये पसरला आहे.
माेठ्या शहरांमध्ये पसरणार ओमायक्राॅन
काेराेनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅन किती धाेकादायक ठरू शकताे, याबाबत जगभरात मंथन सुरू आहे. याबाबत देशातील तज्ज्ञांनी दिलासादायक माहिती दिली आहे. ओमायक्राॅन हा देशातील माेठ्या शहरांमध्ये पसरेल. मात्र, त्याची लक्षणे अतिशय साैम्य राहतील, असे वैज्ञानिक आणि औद्याेगिक संशाेधन परिषदेचे माजी प्रमुख डाॅ. राकेश मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, की ओमायक्राॅनविराेधात हायब्रीड इम्युनिटी अतिशय प्रभावी ठरू शकते. दुसऱ्या लाटेनंतर अनेकांना काेराेनाचा संसर्ग हाेऊन गेला. तसेच माेठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे भक्कम राेगप्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. नवे व्हेरिएंट येतच राहणार आहेत. ते राेखण्यासाठी काेणताही ठाेस उपाय नाही, असेही डाॅ. मिश्रा म्हणाले.