बीड - मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीवरील पुलावरून खोल नदीपात्रात बस कोसळून भीषण दुर्घटना घडली. सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्राच्या एसटी बसला हा अपघाता झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 8 मृतदेहांची ओळख पटल्याचे सांगितले जात आहे. यापैकी तिघे जळगावचे तर दोन राजस्थानचे आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ट्विटवरुन शोक व्यक्त केला आहे. तसेच, सर्वोतोपरी मदतीचे आदेशही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी ट्विटरवरुन म्हटले. या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडें यांनीही ट्विट करुन दु:ख झाल्याचं सांगितलं.
Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: आठ जणांची ओळख पटली; मृतांपैकी पाच जण महाराष्ट्रातील
मध्य प्रदेशच्या इंदौरहून अमळनेरला जात असलेल्या या एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरु असून क्रेनने बस नदीपात्राबाहेर काढण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 022-23023940 असा हा क्रमांक आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत, मृतांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशातील बस दुर्घटनेसंदर्भात ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. दुःख होणार अशी बातमी आज सकाळी आली. जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी फोनवरुन निरोप दिला. पुणे येथून निघालेली एक बस पुलावरुन नर्मदा नदीत पडली आहे. ही बातमी मन सुन्न करुन गेली, असे पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, मी संबधित लोकांना कळवले असून कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीमशी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असे म्हणत पंकजा यांनी मध्य प्रदेशच्या भाजपा प्रदेश मंत्र्यांचा फोन नंबरही शेअर केला आहे.