पिलिभीत: उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये एका मैदानात कंडोमची हजारो पाकिटं आढळून आली. इतक्या मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटं उघड्यावर पडून असल्याचं पाहून तिथून जात असलेल्या अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कोणाची नजर नसल्याचं पाहून काहींनी कंडोमची पाकिटं खिशात टाकली आणि तिथून काढता पाया घेतला. पिलिभीत शहरातील नखासा परिसरात हा प्रकार घडला.
मैदानात कंडोमची हजारो पाकिटं पडली असल्याची माहिती २४ तासांनंतर आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर विभागाचे कर्मचारी मैदानात पोहोचले. त्यांनी कंडोमची पाकिटं गोळा केली. सोमवारी नखासा परिसरात कंडोमची हजारो पाकिटं लोकांना दिसली. पाकिटांमधील कंडोमची मुदत संपली असावी, असं आधी लोकांना वाटलं. मात्र एक्स्पायरी डेट २०२४ ची असल्याचं काहींच्या लक्षात आलं.
आसपासच्या लोकांची नजर चुकवून काहींनी कंडोमची पाकिटं उचलली आणि खिशात टाकून तिथून निघून गेले. या कंडोमच्या पाकिटांवर नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (एनएसीओ) आणि एचआयव्ही हेल्पलाईन नंबर १०९७ सोबतच फ्री सप्लाय नॉट फॉर सेल असाही उल्लेख होता. त्यामुळे हे कंडोम विक्रीसाठी नव्हते, तर मोफत वाटपासाठी होते हे स्पष्ट झालं.
कंडोम जमिनीवर पडलेले सापडल्यानं त्यांचा वापर केला जाऊ शकत नसल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी आलोक कुमार यांनी सांगितलं. कंडोमची हजारो पाकिटं मैदानात का आणि कोणी फेकली हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकार एनएसीओच्या माध्यमातून कंडोमचं वाटप करतं. एनएसीओ जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या एनजीओच्या माध्यमातून कंडोमचं करते. काही जण लोकलज्जेस्तव मेडिकल आणि सरकारी रुग्णालयातून कंडोम खरेदी करत नाही. त्यांच्या घरांपर्यंत कंडोम पोहोचवली जातात.