सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी तूर्त तरी कायम आहे. संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी तसेच राजधानी दिल्लीत ये-जा करण्यासाठी त्यांना आणखी काही काळ ट्रेननेच प्रवास करावा लागेल, असे दिसते. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केल्यानंतर फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाईन्स(एफआयए)ने गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवसेनेचे खासदार मात्र गायकवाड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत म्हणाले, गायकवाड यांच्या कथित कृत्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा कोणत्याही कृत्याचे शिवसेना समर्थन करीत नसली तरी विमान कंपन्यांचा सध्याचा व्यवहार देखील गुंडांगर्दी सारखाच आहे. गायकवाडप्रकरणी शिवसेना खासदारांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. हवाई वाहतूक मंत्र्यांनाही यावेळी लोकसभाध्यक्षांनी बोलावून घेतले होते. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत गायकवाडांवरील विमान प्रवास बंदी उठवण्याबाबत अद्याप काही मार्ग निघालेला नाही. गायकवाडप्रकरणी आपली प्रतिक्रिया नोंदवताना भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, एअर इंडिया ही काही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही. प्रश्न नीतीगत धोरणाचा आहे. एअर इंडियाने अशा प्रकारे चौकशी न करता कोणावरही प्रवासबंदी लादणे योग्य नाही.एअरलाईन्सच्या बंदीनंतर गायकवाड प्रकरणी बोलतांना दिल्ली पोलीसांचे प्रवक्ते दीपेंद्र पाठक म्हणाले, एअर इंडिया कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार खासदार गायकवाड यांच्या विरोधात इंडियन पिनल कोड 308 व 355 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.
विमान कंपन्यांचा व्यवहार देखील गुंडागर्दीसारखाच - संजय राऊत
By admin | Published: March 30, 2017 9:18 PM