डेहरादून : बंडखोर आमदारांच्या सौदेबाजीसंबंधी ‘स्टिंग आॅपरेशन’च्या वेळी मी हजर होतो, अशी कबुली रविवारी देतानाच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी ही सीडी बनविण्यामागे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.आजवर कथित स्टिंग आॅपरेशनची सीडी बनावट आणि चुकीची असल्याचा तसेच आमदारांच्या सौदेबाजीत सहभाग नसल्याचा दावा करणाऱ्या रावत यांनी रविवारी प्रथमच ‘स्टिंग आॅपरेशन’च्या वेळी हजर असल्याची कबुली देत खळबळ उडवून दिली आहे. या सीडीमध्ये बंडखोर आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मी पैसे देऊ केले किंवा पदाचा प्रस्ताव ठेवल्याचे पुरावे असल्यास गजबजलेल्या क्लॉक टॉवरवर जाहीररीत्या फासावर जाण्याची माझी तयारी आहे, या शब्दांत त्यांनी आव्हानही दिले आहे.स्टिंग आॅपरेशन हे माझे सरकार पाडण्याचा एक भाग असून माझी कारागृहात जाण्याची तयारी आहे, असे ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. सीडी प्रकरण आणि सीबीआयच्या तपासावरून राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा मला अडकवण्याचे कारस्थान करीत असून त्यांनी केलेला अत्याचार सहन करण्याची माझी तयारी असेल. उत्तराखंडच्या विकासासाठी माझा संघर्ष सुरू राहील. मी माघार घेणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (वृत्तसंस्था)पत्रकारांना भेटणे गुन्हा का?एखाद्या पत्रकाराला भेटणे गुन्हा आहे काय? तांत्रिकदृष्ट्या अपात्र घोषित न झालेल्या आमदारांपैकी कुणी माझ्याशी चर्चा केली असेल तर त्यामुळे काय फरक पडतो, असा सवालही रावत यांनी केला. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकाने स्टिंग सीडी बनविली असून भाजपाच्या गोटात गेलेल्या नऊ बंडखोर आमदारांनी ती वितरित केली आहे. बंडखोरी करून सरकारला अल्पमतात आणणाऱ्या आमदारांचे समर्थन मिळविण्यासाठी रावत हे या पत्रकारासोबत चर्चेच्या वेळी सौदेबाजी करीत असल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. यातील सौदेबाजीवर रावत यांनी आक्षेप घेतला असला तरी स्टिंग सीडी बनविणाऱ्या पत्रकाराला भेटल्याची थेट कबुली दिली आहे.
‘स्टिंग’वेळी हजेरीची रावत यांच्याकडून कबुली
By admin | Published: May 02, 2016 2:27 AM