नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालय खूप गर्दीच्या मार्गांवर प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी जे प्रयत्न करीत आहे त्यांना यश आले, तर प्रवाशाला त्याच्या पसंतीच्या रेल्वेत झोपण्याची जागा (बर्थ) मिळेल अशी खात्री २०२१ पासून देता येईल. सध्या प्रवाशांकडून असलेली मागणी आणि रेल्वेत झोपून प्रवास करण्याची उपलब्ध असलेली जागा यात खूपच अंतर आहे. विशेषत: दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई या अत्यंत गर्दीच्या मार्गावर प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अनेक प्रवाशांना तिकिटे घेऊन प्रतीक्षा करावी लागते. त्याचा अर्थ असा की, तिकीट निश्चित (कन्फर्मड्) झाले नाही, तर त्याला प्रवास करू दिला जात नाही. मागणी आणि उपलब्धता यातील अंतर भरून काढण्यासाठी रेल्वे प्रचंड गर्दीच्या मार्गांवर आणखी प्रवासी गाड्या सुरू करण्याचा विचार करीत आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, मालवाहतुकीच्या रेल्वे खास त्यांच्यासाठीच्या मार्गांवर (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स-डीएफसी) पाठवल्या, तर वरील योजना साकार होऊ शकते व त्याचे काम पूर्ण वेगात सुरू आहे. दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई या गर्दीच्या मार्गांवर पायाभूत सुविधा गाड्यांची गती वाढवण्यासाठी सुधारून घेतल्या जात आहेत. हे मार्ग सध्या पूर्णपणे व्यापले गेलेले आहेत. डीएफसी कार्यरत होताच हायस्पीड प्रवासी रेल्वेंना जास्त वाव मिळेल, असे प्रभू यांनी भारतीय व्यापार महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. दमदार वाटचाल३,२२८ किलोमीटर लांबीचा पूर्व आणि पश्चिम मार्ग खास मालवाहू रेल्वेंसाठी असून, तो डिसेंबर २०१९ पासून कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय रेल्वेने दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई रेल्वे मार्ग ताशी २०० किलोमीटर वेगाने गाड्या धावण्यासाठी बनवण्याचे काम सुरू केले आहे.
प्रवाशांना रेल्वेत २०२१ पासून मिळणार ‘कन्फर्म’ बर्थ !
By admin | Published: April 29, 2017 12:30 AM