नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली आहे.
शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, ओमानहून आलेल्या तामिळनाडूमधील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. तर इराणहून आलेल्या लड्डाखमधील दोघांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली आहे.
याआधी भारतात कोरोना व्हायरच्या रूग्णांची संख्या 31 इतकी होती. या 31 पैकी 15 रुग्णांवर गुरुग्राममध्ये उपचार सुरू आहेत. दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत. एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला आले होते.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासंदर्भातील देशातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी शनिवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे आणि इतर उच्चाधिकारी उपस्थित होते.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
आणखी बातम्या
coronavirus : फेसबुकचे लंडनमधील ऑफिस बंद, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा
पुलवामा हल्ल्याचे अॅमेझॉन कनेक्शन; ऑर्डर मिळताच पाठविले 'बॉम्ब' बनविण्याचे साहित्य
आम्ही भाजपापासून वेगळे झालो, पण...; उद्धव ठाकरेंचा अयोध्येतून 'रामबाण'
कोरोनाची धास्ती : 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी, बायोमेट्रीक हजेरीही बंद