कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 04:49 PM2024-06-29T16:49:31+5:302024-06-29T16:51:59+5:30
कर्नाटकात आणखी तीन उपमुख्यमंत्र्यांची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी सांगितले की, पक्षाच्या हितासाठी पक्षकारांनी जाहीर वक्तव्ये करणे टाळावे. राज्याच्या मंत्रिमंडळात आणखी एक उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसापासून कर्नाटकात आणखी एका उपमुख्यमंतत्र्याची मागणी सुरू आहे. यावरुन कर्नाटककाँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. दरम्यान, आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना या विषयावर सार्वजनिक विधाने देणे टाळण्यास सांगितले आणि शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला.
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
डीके शिवकुमार यांनी पक्षाच्या हितासाठी 'तोंड बंद ठेवा' असे आवाहन पक्षकारांना केले आहे आणि संतांनाही विनंती केली आहे की त्यांनी राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. राज्यातील काही मंत्री वीरशैव-लिंगायत, अनुसूचित जाती/जमाती आणि अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला देत आहेत. सध्या डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असून ते वोक्कलिगा समाजाचे आहेत.
आणखी तीन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची मागणी करणारी मंत्र्यांची विधाने डिके शिवकुमार यांना शह देण्यासाठी सीएम सिद्धरामय्या यांच्या गटातील नेत्यांनी केल्याचे बोलले जात आहे. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतात, अशी चर्चा आहे.
यानंतर वीरशैव-लिंगायत संत श्रीशैल जगद्गुरू चन्ना सिद्धराम पंडितराध्या स्वामीजी यांनी शुक्रवारी सांगितले की, नेतृत्व बदल झाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या समाजातील मंत्र्यांचा विचार केला पाहिजे. त्यांना अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदावर प्राधान्य देण्याचेही त्यांनी समर्थन केले.
डीके शिवकुमार म्हणाले, 'कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही किंवा मुख्यमंत्र्यांबाबत प्रश्नही नाही. स्वामीजी माझ्याबद्दल त्यांच्या प्रेमापोटी बोलले असावेत. मी विनंती करतो, मला कोणाच्या शिफारशीची गरज नाही. आम्ही केलेल्या कामाचा निर्णय आमचा पक्ष हायकमांड घेईल.