नवी दिल्ली - आम आदमी पक्षातील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पक्षस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते आशुतोष यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. टिष्ट्वटरवरून त्यांनी पक्षत्यागाची माहिती दिली. त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली. अर्थात पक्षाच्या राजकीय कामकाज समितीने आशुतोष यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, या जन्मी राजीनामा स्वीकारणार नसल्याचे सांगितल्याने आता आशुतोष यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.आशुतोष यांची नाराजी दूर करण्यात येईल, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली. त्यांच्या पक्षत्यागामागे त्यांना राज्यसभा सदस्यत्व डावलण्यात आल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. अर्थात त्यावर अद्याप पक्षनेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.आशुतोष यांनी टिष्ट्वटरवर म्हटले, ‘‘प्र्रत्येक प्रवास संपतोच. ‘आप’समवेतचा माझा क्रांतिकारी प्रवास संपला आहे. मी पक्षाचा राजीनामा दिला असून ‘पीएसी’ला तो स्वीकारण्याची विनंती केली आहे.’’ अत्यंत खासगी कारणांसाठीच राजीनामा दिल्याचे आशुतोष यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय प्रवासात सहकार्य करणारे, नेते, कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. अत्यंत मोजक्या शब्दांत तेही टिष्ट्वटरवरून राजीनामा दिल्याने ‘आप’मध्ये तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्वातंत्र्य दिनी पक्षत्याग करण्याची वेळ आशुतोष यांच्यावर येण्यास कोण कारणीभूत आहे, अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारविरोधात अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांनी आंदोलन छेडले होते. त्यास मोठे यश मिळाले. राजकीय अपरिहार्यतेचे कारण पुढे करून केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला सहकारी असलेल्या योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची दिल्लीत सत्तास्थापनेनंतर केजरीवाल यांनी हकालपट्टी केली होती. तर दोन्ही नेत्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचे सांगितले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील धुसफुस समोर आली आहे.पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या आशुतोष यांनी २०१४ साली चांदनी चौकातून आपतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांना डॉ. हर्षवर्धन यांनी पराभूत केले़
सत्तासंघर्ष : आपमधील अंतर्गत धुसफुस टिष्ट्वटरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:09 AM