नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) घोटाळ्यांवरून मंगळवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी करीत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ घातला. तेव्हा लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना कठोर शब्दांत समज दिली. गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना देशहित नव्हे, तर स्वहित महत्त्वाचे वाटते, असे त्या म्हणाल्या. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा देत हौद्यात धाव घेतली. गदारोळातच महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यासंबंधीच्या १० नोटिसा फेटाळल्या. काँग्रेसच्या सदस्यांना केवळ सभागृहातील कामकाजाचा खोळंबा करायचा आहे, असे महाजन म्हणाल्या. सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे असल्यामुळे देशहित लक्षात घेत काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ थांबवावा, असे आवाहन बिजदचे वैजयंत पांडा यांनी केले होते. (वृत्तसंस्था) २० खासदारांचीनावे सादर...काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री उत्तर देत असताना काँग्रेसच्या २० सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेत तसेच टाळ्या वाजवत स्वत:कडे लक्ष वेधले. त्यावर महाजन संतप्त झाल्या. हौद्यात धाव घेतलेल्या सर्व सदस्यांची नावे मला सादर करा, असा आदेशही महाजन यांनी लोकसभा सचिवालयाच्या अधिकाऱ्यांना दिला. गोंधळ सुरू असतानाही त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरूच ठेवला.
गोंधळ घालणाऱ्या खासदारांना दिली समज
By admin | Published: December 23, 2015 2:08 AM