ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - १९९९ मधील कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळताना भारताच्या आपातकालीन यंत्रणांचा गोंधळ उडाला होता अशी जाहीर कबुली रॉचे तत्कालीन प्रमुख ए.एस. दुलत यांनी दिली आहे. विमान अमृतसरमध्ये उतरले तेव्हा केंद्र व पंजाब सरकार कोणताही निर्णय घेऊ शकली नाही व आपण अपहरणकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याची एक संधी गमावली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी १९९९ चे कंदहार विमान अपहरण प्रकरण हाताळले असून शुक्रवारी त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अपहरणाच्या कटू आठवणींना उजाळा दिला. दुलत म्हणतात, क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपचा (सीएमजी) कंदहार अपहरण प्रकरण हाताळताना गोंधळ उडाला होता, विमान ज्यावेळी पंजाबमध्ये होते त्यावेळी पंजाब सरकार व केंद्र सरकार काहीच करु शकले नाही, पंजाब पोलिसांचे जवान विमानतळ परिसरात होते मात्र केंद्राकडून आदेशाची प्रतिक्षा करावी लागल्याने पोलिस काहीच करु शकले नाही असे दुलत यांनी सांगितले. दुलत यांनी नेमका काय गोंधळ होता यावर सखोल भाष्य करणे टाळले. कंदहार प्रकरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु होता असेही दुलत यांनी म्हटले आहे. कंदहार अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला चांगलेच संतापले होते, रागाच्या भरात ते राजीनामाही द्यायला तयार होते, त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना दुरध्वनी करुन झापलेही होते अशी आठवण दुलत यांनी सांगितली.