काँग्रेस करणार गरिबीवर सर्जिकल स्ट्राइक; राहुल गांधी यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:20 AM2019-03-27T05:20:58+5:302019-03-27T05:25:02+5:30
देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जयपूर : देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गरिबाच्या खात्यात दरमहा ६ हजार रुपये जमा होतीलच असे ते म्हणाले. याचाच अर्थ १२ हजार रुपयांहून कमी मासिक उत्पन्न असणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ६ हजार रुपये होतीलच.
काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली . त्यानंतर आज राजस्थानमधील सुरजगढ येथील सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत फक्त श्रीमंत लोकच भरभराटीची स्वप्ने पाहू शकतात. काँग्रेसच या देशातील गरिबी कायमची नष्ट करेल. न्याय योजना म्हणजे एक प्रकारचा ‘धमाका' असून अशा पद्धतीची ऐतिहासिक योजना आजवर जगातील एकाही देशाने राबविलेली नाही. न्याय योजना लागू झाल्यास भारतात एकही माणूस गरीब राहाणार नाही. राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही बेकारीचे प्रमाण कमी करण्याचे कसोशीने प्रयत्न करू. जर नरेंद्र मोदी श्रीमंतांनाच पैसे देत असतील, तर काँग्रेस गरीबांना पैसे देईल. ज्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे अशांनाच मोदी यांनी मदत केली आहे. यूपीए सरकारने ज्यांना दारिद्र्य रेषेखालून वर आणले त्यांनाच पुन्हा गरीब करण्याचे काम गेल्या पाच वर्षांत मोदींनी केले आहे. यूपीए सरकारच्या काळात १४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त करण्यात आले होते असा दावा त्यांनी केला होता. (वृत्तसंस्था)
मोदी अंबानींचे चौकीदार
राहुल गांधी म्हणाले की, भारतामध्ये अजूनही २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यानंतर प्रत्येकाला योग्य मजुरी व उत्पादनाला रास्त भाव मिळेल. यूपीए सरकारने दहा वर्षांच्या कारकिर्दीत राबविलेल्या योजना मोदींनी बंद केल्या. मनरेगा या मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या योजनेचे महत्त्व पंतप्रधानांच्या लक्षातच आले नाही. मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे चौकीदार आहेत.