ठळक मुद्देदिवाळीच्या शुभ मुहुर्तावर दिल्लीतील अक्षरधाम मंदिरामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह पूजा केली या पूजेवरून आता अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी त्यांच्यावर नाराज झाले आहेतअरविंद केजरीवाल यांचे हिंदू नेता बनल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, असे आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे
नवी दिल्ली - शनिवारी दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर दिल्लीतील अक्षरधाम मंदिरामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह पूजा केली होती. तसेच या पूजेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते. दरम्यान, या पूजेवरून आता अरविंद केजरीवाल यांचे माजी सहकारी त्यांच्यावर नाराज झाले आहेत. आम आदमी पक्षाचे माजी सदस्य आणि चांदनी चौक मतदार संघातील उमेदवार राहिलेले आशुतोष यांनी दिवाळीला केलेल्या या पूजेवरून अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे.
दिवाळीदिवशी दिल्लीतील जनतेसोबत पूजा करण्यासाठी टीव्हीवर जाहीराती देणे आणि या पूजेचे लाईव्ह प्रसारण करण्यावरून आशुतोष यांनी ट्विटरवरून अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे. अरविंद केजरीवाल यांचे हिंदू नेता बनल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, असे आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून लढल्यानंतर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली प्रदेशची जबाबदारीसुद्धा सांभाळली होती आणि २०१७ मध्ये आम आदमी पक्षाने दिल्ली नगर निगमची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली होती. मात्र २०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात वैयक्तिक कारणांचा हवाला देऊन आशुतोष यांनी आम आदमी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरामध्ये दिवाळीची पूजा केली होती तयावेळी केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेसुद्धा उपस्थित होते. या पूजेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.दरम्यान, या पूजेपूर्वी या सोहळ्याची मोठ्या प्रमाणात जाहीरातही करण्यात आली होती. दिल्लीतील दोन कोटी लोक सोबत मिळून दिवाळीची पूजा करतील आणि आज संध्याकाळी ७. ३९ च्या मुहुर्तावर मंत्राचा जप करतील. ज्याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. या आपण सर्वजण मिळून दिल्लीतील दिवाळीचा भाग बनूया, असे आवाहन दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते.